गांजा तस्करी करणाऱ्यावर शिऊर पोलिसांची जम्बो कारवाई.
वैजापूर: हस्तगत केला १४ लाखांचा मुद्देमाल, एका परप्रांतिय आरोपीस अटक
वैजापूर पुढारी वृत्तसेवा : आलिशान इनोवा वाहनातून गांजा तस्करी करणाऱ्या एका परप्रांतीय तस्करास पकडून त्याच्या ताब्यातून ३ लाख ९५ हजार रुपये किमतीचा गांजा व इतर मुद्देमाल मिळून असा एकुण १४ लाख ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत शिऊर पोलिसांनी ही जम्बो कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिऊर पोलीस हे पहाटेच्या सुमारास गस्तीवर असतांना शिऊर बंगला येथे एक जे.एल.०५.७६६८ क्रमांकाची इनोवा कार संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे दिसून आले सदरील माहिती पोलीस कर्मचारी यांनी ठाणे प्रमुख वैभव रणखांब यांना दिली माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रणखांब यांनी घटनास्थळी पोहोचून गाडीत बसलेल्या चालकास विचारणा केली असता त्याच्याकडून संशयास्पद हालचाली आढळून आल्या. यामुळे पोलिसांनी गाडीची झाडाझडती घेतली असता त्यांना गाडीत गांजा मिळून आला त्यामुळे पोलिसांनी अवैध गांजा तस्करी करणाऱ्या वाहन चालकास पोलीस ठाण्यात आणून वरिष्ठ अधिकारी व पांचासमक्ष पंचनामा करून कायदेशीर चौकशी करून गुन्हा दाखल केला असून आरोपीकडून तब्बल १४ लाख ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड,अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार,सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब,पोलीस उपनिरीक्षक चेतन ओगले,पोलीस हेड कॉन्स्टेबल,विशाल पैठणकर,सुभाष ठोके, किशोर आघाडे,गणेश गोरक्ष,कॉन्स्टेबल सविता वरपे,गवळी यांच्या पथकाने केली.